September 15, 2013

रेमीची मराठी बोली - एक व्यत्यासकथा

'i'ness - 'मी'पण - रेमीचे सेल्फ-पोर्ट्रेट । सन १९६७ ।
संगणकाचा वापर करून हे चित्र पुन्हा रेखाटले. विज्ञानात अनेक लिप्या सोयीप्रमाणे आल्या. तसाच येथे भूमितीचा वापर केला. स्व-प्रतिमेत चेहरा दिसायला हवाच का!

('रेमीची मराठी बोली' या शीर्षकाखाली हे गद्यकाव्य किंवा व्यत्यास-कथा पूर्वी २१ जून २००८ साली जेव्हा हा ब्लॉग सुरू करताना प्रसिद्ध केला होता. ते "jpg" चित्र होते. त्याच्यात काही फेरफार, दुरुस्त्या करून पुनश्च प्रसिद्ध करतोय.)

रेमीची मराठी बोली

रेमीचा आणखी एक : मराठी ब्लॉग : भाषा मराठी पण बोली वेगळी.
एका कुटुंबात १०, ५, किंवा २ माणसे असतील, त्यांचे उच्चार वा बोलण्याची लकब सारखीच असेल, वा भासेल, पण बोली मात्र कालमान वातावरणानुसार स्वतंत्र असते; जसे बोटांचे ठसे. जसे एकाच झाडावरील प्रत्येक पानावरील शिरांचे चित्र मात्र वेगवेगळे असते.

तसे वाहनतळावर उभ्या असलेल्या मोटारींचे नसते. रंग आणि आकारात कितीही विविधता आणण्याचा  प्रयत्न केला तरीही! तीच गोष्ट शहरातील आधुनिक इमारतींची ! पण गावातील मातीची किंवा दगडाची घरे ग्रामीण शैलीची असली तरी मोहवल्यावाचून राहात नाहीत.

हीच तर नैसर्गिक विविधतेची रंगत आहे.

पन्नास-साठ वर्षे भटकंती केल्यावर त्याची छाप रेमीच्या बोलीवर  — शब्द, अर्थ आणि नाद यावर  — पडल्यावाचून कशी राहील ?

आयुष्यभर भटकंती करणारा नेहमी समासाच्या कडेवर फिरत असतो. पण त्याचे फिरणे टांग्याला बांधलेल्या घोड्यासारखे झडपा लावलेले नसते. किंवा  रुळावर दौडणाऱ्या आगगाडीसारखे नसते. किंवा नसते विमानाचे एका टींबापासून दुसऱ्या टींबापर्यंत आखलेले उड्डान. किंवा नसते त्याला जाती-धर्म-वर्गाची बांधिलकी.

त्याची भटकंती असते मधमाशीचा प्रवास  — तिच्याबरोबर तिचे पोळेपण फिरत असते.
त्याची भटकंती असते वनवासीचा अरण्यातील स्वैर स्वच्छंद विहार.

सह्याद्रीच्या पायथ्याशी सुरु झालेल्या या भटकंतीची  सांगता होणार जगल्यावाचल्यास परतल्यावर मायदेशी  — गोंडवनी.
 
रेमिजीयस डिसोजा
२१-०६-२००८
मुंबई

टीप : सुधारित पोस्ट

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.


No comments:

Post a Comment