September 19, 2013

अहंकार उर्मट आधुनिक संस्कृतीचा

धरतरीवर उल्का कुंड

अहंकार उर्मट उच्च तंत्रज्ञाचा,
झडपा लेवून, हिमालयाएवढ्या उंचीचा,
निर्मीतो उपग्रह, कॉम्पूटर ते महानगर,
खोदितो कायमची भगदाडे खोलवर,
उल्कांहूनी, धरतरीच्या उरावर :
महायुद्धे अगणित नादाविना भेसूर.
---
रेमीजीयस डिसोजा । मुंबई
(मूळ इंग्रजी कवितेचे भाषांतर)
०६:३१, २८-१२-२०११
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

September 15, 2013

रेमीची मराठी बोली - एक व्यत्यासकथा

'i'ness - 'मी'पण - रेमीचे सेल्फ-पोर्ट्रेट । सन १९६७ ।
संगणकाचा वापर करून हे चित्र पुन्हा रेखाटले. विज्ञानात अनेक लिप्या सोयीप्रमाणे आल्या. तसाच येथे भूमितीचा वापर केला. स्व-प्रतिमेत चेहरा दिसायला हवाच का!

('रेमीची मराठी बोली' या शीर्षकाखाली हे गद्यकाव्य किंवा व्यत्यास-कथा पूर्वी २१ जून २००८ साली जेव्हा हा ब्लॉग सुरू करताना प्रसिद्ध केला होता. ते "jpg" चित्र होते. त्याच्यात काही फेरफार, दुरुस्त्या करून पुनश्च प्रसिद्ध करतोय.)

रेमीची मराठी बोली

रेमीचा आणखी एक : मराठी ब्लॉग : भाषा मराठी पण बोली वेगळी.
एका कुटुंबात १०, ५, किंवा २ माणसे असतील, त्यांचे उच्चार वा बोलण्याची लकब सारखीच असेल, वा भासेल, पण बोली मात्र कालमान वातावरणानुसार स्वतंत्र असते; जसे बोटांचे ठसे. जसे एकाच झाडावरील प्रत्येक पानावरील शिरांचे चित्र मात्र वेगवेगळे असते.

तसे वाहनतळावर उभ्या असलेल्या मोटारींचे नसते. रंग आणि आकारात कितीही विविधता आणण्याचा  प्रयत्न केला तरीही! तीच गोष्ट शहरातील आधुनिक इमारतींची ! पण गावातील मातीची किंवा दगडाची घरे ग्रामीण शैलीची असली तरी मोहवल्यावाचून राहात नाहीत.

हीच तर नैसर्गिक विविधतेची रंगत आहे.

पन्नास-साठ वर्षे भटकंती केल्यावर त्याची छाप रेमीच्या बोलीवर  — शब्द, अर्थ आणि नाद यावर  — पडल्यावाचून कशी राहील ?

आयुष्यभर भटकंती करणारा नेहमी समासाच्या कडेवर फिरत असतो. पण त्याचे फिरणे टांग्याला बांधलेल्या घोड्यासारखे झडपा लावलेले नसते. किंवा  रुळावर दौडणाऱ्या आगगाडीसारखे नसते. किंवा नसते विमानाचे एका टींबापासून दुसऱ्या टींबापर्यंत आखलेले उड्डान. किंवा नसते त्याला जाती-धर्म-वर्गाची बांधिलकी.

त्याची भटकंती असते मधमाशीचा प्रवास  — तिच्याबरोबर तिचे पोळेपण फिरत असते.
त्याची भटकंती असते वनवासीचा अरण्यातील स्वैर स्वच्छंद विहार.

सह्याद्रीच्या पायथ्याशी सुरु झालेल्या या भटकंतीची  सांगता होणार जगल्यावाचल्यास परतल्यावर मायदेशी  — गोंडवनी.
 
रेमिजीयस डिसोजा
२१-०६-२००८
मुंबई

टीप : सुधारित पोस्ट

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.


September 10, 2013

भग्नमूर्ती

सृष्टीयोग 

 
मातृदेवता

सुमारे तीस हजार वर्षांपुर्वीची मूर्ती, पाश्चिमात्यांनी तिला नाव दिले 'व्हिनस'. मी नाव  दिले 'मातृदेवता. आदिवासी जमातीत अजूनही योनी-पूजा अस्तित्वात आहे.

 

१. भग्नमूर्ती


कल्पना, विचार, तर्क, तर्काच्या पलिकडे... युरेकाऽऽऽ ।
वर्षांमागून वर्षें गेली, दशके गेली; एक ठिणगी अनेक घटनांच्या राखेच्या थराखाली जीवंत राहिली, उलटसुलट सतत येणार्‌या चक्रीवादळांत, झंझावातांत तगून राहिली. 


सर्जनाचा कस लागतो आपल्याच लेखी. लोकप्रवाद मागे पडतात. मळलेल्या वाटा संपतात. पुढचे मार्ग कुंठीत होतात. मागे वाळवंटे खंडारे भगदाडे पन्नास शतकांची. समोर खोल खाई मृत्युची. त्यापल्याड हिरवाई, छलांगाच्या अंतरावर.

आता माघारा फिरलास, गड्या, तर वेसण कायमची. आणि षंढाचे जीणे. कुणाचे काही जात नाही. प्राण एकवटून मार छलांग!

२. अवतरण : ' भग्नमूर्ती ' (मुक्तछंद)


निसर्गस्वभाव, निसर्ग शक्ति, ।
निसर्गांत जें जें आहे तें सारें मानवांतहि ।
आणिक अधिक त्याहून आहे ।
निसर्गाची जी अंतिम सीमा ।
मनुजकार्याचा आरंभ तेथे ।
तेथून विकास मानवतेचा ।
तेथून पुढे जाण्यासाठीच धडपड त्याची ।
तेंच उद्दिष्ट साधायासाठी ।
त्याची कला शास्त्रें विद्या तत्त्वज्ञान ।
धर्म आचार विचार आणि ।
नीतिनियम. ।
(टीप : 
हे अवतरण काव्यशास्त्राच्या एका पुस्तकात मिळाले. लेखकाने कवीचे नाव दिलेले नाही. अशाच अनेक अवतरणांचे संदर्भ / नावे दिलेली नाहीत. मुक्तछंदात लिहिलेले हे मराठीतले पहिले दीर्घकाव्य आहे असा उल्लेख मात्र आहे. वाचकांना माहित असल्यास अवश्य कळवावे.)

' भग्नमूर्ती ' चे वरील अवतरण वाचून सुचलेले विचार :


 कवीची निसर्गासंबंधीची कल्पना बालसदृश किंवा बालिशपण नाहिय. आणि आधुनिकपण नाहीय. निसर्गाला एवढे तुच्छ लेखून कोणाचाच निभाव लागणार नाही हे नक्कीच. पश्चिमेचा प्रभाव कवीवर नक्कीच असावा!
 
प्रागैतिहासिक काळातील मानवाने, जेव्हा सुसंस्कृत समाज अस्तित्वात नव्हते, कधीही या कवीप्रमाणे विचार केला नसता. त्या मानवांचा निसर्गाशी सुसंवाद जुळलेला होता यात शंकाच नाही. याचा अर्थ तेव्हा कला आणि विज्ञान अस्तित्वात नव्हते असा नाही. आतासारखे ते एकमेकापासून वेगळे नव्हते.


आजही तथाकथित अश्मयुगात राहणारे मानव भूतलावर आहेत.
अथवा भविष्यात नागरी संस्कृतिंचा विनाश झाल्यानंतरचे मानवपण असा विचार करण्याचे धारिष्ट्यपण करणार नाहीत.


३. भग्नमूर्ती 


प्राथमिक शाळेत शिकताना मला भातशेती-शाकशेती, सूत कताई-विणाई, मातीची घरबांधणी - अन्न, वस्त्र, निवारा - या मूलभूत गरजा भागवण्याचे शिक्षणपण गावले. तसेच परिसरातील बारा बलुतेदार आणि अठरापगड जाती यांना जवळून बघायची संधीपण मिळाली (घेतली). त्यावेळी मी 'मानववंशशास्त्र' हा शब्द ऐकलापण नव्हता.
इथूनच माझा लोकजीवन बघायचा छंद सुरू झाला. आणि छंदात कविता रचायचा छंदपण ! कालांतराने माझ्या कवितेतील छंद, वृत्त, जाति, अलंकार आयुष्याच्या पायवाटेवर कधी हरवले समजलेच नाही. आयुष्यात एक विद्रोह सुरू झाला.


४. 'भग्नमूर्ती'


निरपेक्ष आयुष्य जगण्याचा छंद आला. जगणेच काव्य झाले, छंद झाले, मुक्त-छंद झाले. मीच कवी आणि माझा मीच रसिक !
 

एक जाणीव आकारत गेली : 'जीवन हे सर्वश्रेष्ठ आहे; सर्व स्थल-कालांत नागरी संस्कृतींनी निर्मिलेल्या सर्व कला, विज्ञाने, धर्म, तत्वज्ञाने व्यापारउदीम, अर्थसंस्था, राज्यसंस्था इत्यादिहून सर्वतोपरी उच्चतम आहे'.

५. 'भग्नमूर्ती'


भ्रमनिरासाच्या प्रक्रियेतून जाताना एक रचना, "अशी एक कविता : एक कोडे" आकारली. तिला अत्त्यानंद उर्फ प्रमोद देव यांनी गायली. त्यावर काही नमुनेदार प्रतिक्रिया आल्या. या वाचनीय आहेत. पण कोडे मात्र अनुत्तरित राहिले.
चवाठ्यावरच्या चर्चेत कधी कधी मूलभूत मुद्दा बाजूला होतो. आणि शब्दच्छल राहातो.
दुवा :

 गायक : अत्त्यानंद उर्फ प्रमोद देव

अशी कविता: एक कोडें

ह्या कवितेत रूपके नाहीत, अलंकार नाहित.
ही कविता फक्त वाचता येते; गाता नाही येत.
ही कविताच एक रूपक आहे, अलंकार आहे,
वास्ताविकतेचा. या कवितेस काय म्हणावे?

कवी:रेमी डिसोजा 


टीप :
१. हल्लीच लिओनार्द दा विंची " कलावंत कि वैज्ञानिक ? " असा वाद विलायतेत झाला.
दुवा : Is Leonardo da Vinci a great artist or a great scientist?
 भरल्यापोटी असे वाद घालणे हा पंडितांचा उद्योगाच आहे म्हणा ना !
२. निसर्गाची एक झलक : शरीरधर्म  BODY DHARMA
 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

September 06, 2013

माहिती युग

अखंडीत चरतो, चरतो, परी विना रवंथ.
विसरतो माझी "चौथी" गरज ---
विना प्रदुषण शौच कैसे?
अरेरे! रेमीला नाही मदत, नाही गुरू, नाही दैवत!

(१९-०३-२००४)श्री गणेश । लिंगराज मंदिर, भुवनेश्वर 

महाभारतासंबंधी एक आख्यायिका आहे. व्यास मुनी महाभारत सांगितल्या प्रमाणे लिहून घेणारया लेखकाच्या शोधात होते. श्री गणेशाचे नाव पुढे आले. श्री गणेश पण "डिक्टेशन" घ्यायला तयार झाला. पण त्याने एक अट घातली. मुनीवरानी न थांबता अखंड "डिक्टेशन" द्यायचे. व्यास मुनीनी मानले, पण त्यानी पण अट घातली, "अर्थ समजल्यावाचून पुढे लिहायचे नाही".

मूळ इंग्रजी "Information Age" या लघु कवितेचे भाषांतर.
~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape