February 10, 2013

सृष्टी संपत्तीचे साधन

सृष्टी अंतर-बाह्य आमच्या आणि पृथ्वीच्या पार अनंत

 सृष्टी

सृष्टी संपत्तीचे साधन 


सर्व जीवमात्राच्या श्रमाने निर्माण होई संपत्ती, ।
महाभूतांच्या साह्ये जळ अन जमिनीतूनी. ॥
नाही टाकसाळीत, ना कारखान्यात, ना शेयरबाजारात; ।
तेथे होतात केवळ घडामोडी आणि उर्जेचा व्यय. ॥
* * *

रेमीजीयस डिसोजा । मुंबई 
(२९-१०-२०१२)


टीप : 'सृष्टी' या चित्रातील पार्श्वभागातील चित्र "NASA" या संस्थेचे आहे. 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

February 06, 2013

टेक्नियम लेखक, निळू दामले (समीक्षा) - भाग २

इलेक्ट्रोनी-माहिती तंत्रज्ञान – ET-IT – युग आणि त्याचे परिणाम 


लोक-उर्जा संधारण 

टेक्नियम : उद्याच्या बदलाचा वेध, निळू दामले (समीक्षा) या मागील लेखावरून (दुवा पहा) पुढे : 

निळू दामले यानी पुस्तकाच्या 'टेक्नियम' या शेवटच्या भागात मानवाच्या औद्योगिक उत्कर्षाचा आढावा घेतलेला आहे. यात महत्वाचा एक उल्लेख राहून गेला आहे, असे मला वाटते.
 
मुखपृष्ठ 
औद्योगिक क्रांती विलायतेत सुरू झाली. अर्थात तिचा उगम विज्ञानात झाला. त्यात वेळोवेळी बदलही केले गेले. (त्याला मानवाची प्रगती म्हणावे, की तंत्राची सुधारणा, याबद्दल मला शंका आहे.) कमी मानवी श्रमांत अधिक उत्पादन!

भारतात सुमारे ८० % लोक खेड्यांत रहातात. तर याउलट विलायतेत व अमेरिकेत (US) २० % लोक खेड्यांत यांत्रिकी शेती करतात. भारतात "अब्ज मानवी ऊर्जे"चा उपयोग कसा करणार? हा खरा आमच्यापुढचा प्रश्र्न!
या प्रश्नाचे उत्तर कोणत्याही शास्त्रात सांगितलेले नाही - धर्म, तत्त्वज्ञान, कला, विज्ञान, शिक्षण, राज्य, अर्थ इ. – कालच्या व आजच्या! कुणाच्या शब्दप्रामाण्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवावे.

मात्र सर्व जीवजातींना आपले जीवन कसे जगायचे तेवढी अक्कल सृष्टीमातेने त्यांना जन्मतःच दिलेली असते.

पण लोकांना २४x७x५२ करमणूक द्यायची हे काही आमच्या प्रश्नाचे उत्तर नव्हे.

विलायतेत यंत्रोद्योग व उत्पादन तेथील मानवांनी तयार केले ते व्यापार आणि नफ्यासाठी! जगाच्या कल्याणासाठी नव्हे. मग त्यांचे भाट, 'भो पंचम जॉर्ज...', इत्यादि काहीपण गातील! आता त्यांची हाव - हवस - वाढत चालली आहे. त्यांचे उत्पादन वाढतेच आहे. आणि त्यांना नव्या बाजारपेठ हव्यात. एवढे करूनही त्यांची अर्थव्यवस्था अधूनमधून ढासळतेच ! 

इलेक्ट्रोनी-माहिती तंत्रयुग (ET-IT Age) आणि त्याचे परिणाम


या युगाचे आधार आहेत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषमता आणि सत्तेचे केंदीकरण, आणि शहरे त्याचे प्रतिक आहेत. याची सुरवात तर नागरी क्रांती किंवा नागरी संस्कृतीच्या उगमापासूनच झालेली आहे. आजही 'जैसे थे' हेच धोरण राहिलेले आहे. 

 फक्त साधन किंवा चेहरा बदलला. राजे गेले, राजकर्ते आले – भांडवलशहा आले, आणि त्यांचा आधुनिक पुरोहित आता विज्ञान / वैज्ञानिक आहेत. 

उद्योग-यंत्र/तंत्र विज्ञानाने उपलब्ध होतो – उदा. औषधी, अण्वास्त्र इत्यादि कोणतीही शाखा घ्या. पण आज मात्र उद्योग, व्यापार, नफा, एकाधिकार ही वसाहतवादाची नवी आयुधे आलेली आहेत. 

प्रमाणीकरण


याचा अप्रत्यक्ष उपयोग व्यक्ती व समष्टीच्या खाजगी क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करण्यात होतो. त्यासाठी कायदा वापरला जातो.

याचे अलिकडचे उदाहरण, लोकसंख्या व संततिनियमन. ही कल्पना विलायतेत जन्माला आली. त्याला तसा, नैतिक जाऊदे, नैसर्गिक न्यायाचा आधार नाही. भारत सरकारने ती कल्पना उचलून धरली.

भारतात संततिनियमन: काळ- इंदिरा गांधीची कारकीर्द; परिणाम- 'आहेरे आणि नाहिरे' या दोघांही वर झाला. पण याचा लेखाजोखा कोणी केला असेल तर ऐकिवात नाही.


'नाहिरे' वर्गावर जुलूम झाले, आणि 'आहेरे' वर्गाने एका 'नकुशा' पिढीला जन्माला घातले. त्याचे परिणाम आता दिसतात. स्त्रीयांवर होणारे अनेक प्रकारचे अत्याचार आता दिसतात. ते कोणत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, ऐतहासिक, पर्यावरणीय कारणांनी उद्भवले याचा विचार करताना कोणी दिसत नाही. मला वाटते अनेक कारणांपैकी संतती-नियमनाचा प्रचार, प्रकल्प आणि कार्य हे एक कारण आहे.


प्रमाणीकरणाने भांडवलशाही राष्ट्राच्या सार्वभौम सीमापण ओलाडल्या जातात. त्याने अनेक लोकसमूह सरसकट दारिद्री आणि सीमांत झाले.

भारतात जमिनीचे सर्वेक्षण


याचे ठळक उदाहरण : एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश सरकारने सर्व देशभर जमीनमापणी केली आणि जमिनीच्या तुकड्याना 'सर्व्हे नंबर' दिले. यामुळे वहीवाट गेली आणि 'जमिनीची मालकी' प्रमाणित झाली. पण जमीनदारी मात्र गेली नाही.

अजूनही अनेक वांशिक / आदिम संस्कृती cultures 'जमिनीची (व पाण्याची) मालकी' अनैतिक व अन्याय्य आहे असे मानतात. कोणत्याही व्यक्तीला किंवा गटाला जमिनीच्या (व पाण्याच्या) मालकीचा अधिकार नाही असं या संस्कृती हजारो वर्षांपासून मानीत आल्या आहेत.

ब्रिटीशांची ही जमिनीला 'सर्वे नंबर' देण्याची सुरवात दूरगामी परिणाम करणारी ठरली. आता अनेक देश ध्रुवीय प्रदेशांतील खनिजे काढण्यासाठी जमिनी बळकावण्याच्या मागे लागलेत.


इ-मेल मोफत असते असा अनेकांचा समज आहे. कागद वापरू नका, इंटरनेट वापरा, झाडे वाचवा, असाही प्रचार चालतो. पण हा विचार करा : झाडे पुन्हा वाढवता येतात. कागदाचे पुनश्चक्रण करता येते. वाळवंटाची वाढ रोखता येते. पुन्हा हिरवाई निर्माण करता येते. पण ज्यांची भूईपासून फारकत झालीय त्यांना हा विचार शिवणे कठिणच. शेवटी इ-मेल साठी लागणारी साधन-संपदा पृथ्वीतून उपलब्ध होते, ज्यावर संपूर्ण जीवमात्राचा हक्क आहे हे विसरून कसे चालेल?

असे वाचण्यात आले की केलिफोर्नियात कुठेतरी कड्याकपारीत कडेकोट बंदोबस्तात आहे एक कोट. इंटरनेटची सारी वहातूक या केंद्रातून जाते. येथे सर्व वहातुकीची नोंद शाबूत ठेवली जाते. यासाठी लागणार्‌या ऊर्जेचा खर्च खर्व, निखर्व डॉलर होतो. त्याशिवाय अंतरिक्षयाने, संगणक, मोबायल फोन इत्यादि मशिने वेगळी.

थोडक्यात : गोपनीयतेची कितीही ग्वाही दिली तरी उपभोक्ता उघडा नागडा असतो. सत्तेच्या केंद्रीकरणाचे हे एक अत्यंत प्रभावशाली आधुनिक हत्यार सत्तेच्या असते.

भारत सरकारने UDI नावाचे प्रमाणपत्र / ओळखपत्र हल्लीच सुरू केलेय. यात नवीन काहीच नाही. हा प्रकार जमिनीला 'सर्व्हे नंबर' देण्यासारखाच आहे. UDI कसे वापरले जाईल याची ग्यारंटी कोणीच देऊ शकणार नाही. आगीने भाकर भाजते आणि वणवा पण पेटतो. 

सरता पालव 


इलेक्ट्रोनीयुग-माहितीयुग! याचा सर्वांत महत्वाचा सदुपयोग म्हणजे  शहरीकरणाचा अंत. पण हितसंबंधी वर्ग — भांडवलशाही — हे कधीच घडू देणार नाही. कारण साधेच आहे. शहरीकरणाचा अंत म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. हे युग मालकी हक्काच्या जाळ्यात अडकलेले आहे.
या महाजालाची लाट नफेबाजीसाठी वापरली जातेय. जीवन सुकर करण्यासाठी नक्कीच नाही. आणि नाही ती सार्वकालिक. या ओझरत्या उल्लेखावाचून ही समीक्षा अपुरी राहिली असती.

_____________________
टीप :
मी दोन वर्षांपूर्वी एक साधा मोबायल घेतला. यावर इंग्रजी-रोमन आणि मराठी-देवनागरी उपलब्ध आहेत. माझ्या ब्लॉगवरचे काही फोटो यावर काढलेले आहेत. तसेच या लेखासह इतर लेख आणि कविता यावर लिहिल्या. इंग्रजी ↔ मराठी भाषांतरे केली. नोटस्‌ टाचणं टिपणं लिहिण्यास हा उपयोगी पडतो. गरजेला एसेमेस, फोन करण्यास वापरतो. बातम्या ऐकतो आणि वाचतो.
हा लेख, आणि इतरत्र, 'जूजूत्सू'चा हा एक लहानसा प्रकार किंवा वापर आहे असं म्हणता येईल.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.