December 29, 2009

वासुदेव : मुंबईत आपला परिसर


वासुदेव, गोंधळी, गोसावी इत्यादि संप्रदायांचे लोक आता उणे होत चालले आहेत.
वरील छायाचित्रातील वासुदेव राहत्या घरांच्या गल्ल्यातून मोकळ्या आवाजात गात चालला होता; ओव्या, भजने, भारुडे इ. दिवाळी नुकतीच आटोपलीय.

मी जेव्हा त्याला फोटोसाठी थांबवले तेव्हा त्याने विचारले, "वार्ताहर का?"
मी म्हटले, "नाही. एक भावीक." मी त्याला बिदागी दिली.
या पंथांच्या लोकाना "भिक्षेकरी" म्हणतात. त्यात अर्थातच लाजीरवणे काही नाही. पण ते सार्थ सुद्धा नाही. गौतम बुद्धाचा भिक्षा मागायचा वाडगा सुप्रसिध्द आहे. आजच्या वैश्यवृत्तीच्या युगात भिक्षा मागणे हीन समजले जाते. मी भिक्षा नाही म्हणत, "बिदागी" म्हणतो.

या साऱ्या इंडियाच्या आदिमप्रत (archetypes) परंपरांचा भाग आहेत. या समाजधारणेतून निर्माण झाल्या होत्या. बारा बलुतेदारांप्रमाणे लोक यानापण बिदागी अजूनही देतात.
११० - ११५ करोड़ लोकवास्तीत कितिकाना मोबाईल फ़ोन / टेलीविजन / आयपोड़ घेणे परवडते?
वासुदेव म्हणजे चालता बोलता ग्रामोफोन / रडियो / वाकिटाकी / रिअलिटी शो!

वासुदेवांची गाणी लोकासाहित्याचा एक भाग आहे.

परंपरेच्या नावाने चाललेल्या गोंधळात परंपरागत गोंधळी मात्र सामील होत नाहित. परंपरेच्या नावाने चाललेले राजकारण त्याना पक्के माहीत असते. असे राजकारण समाजधारणेला नव्हे तर समाज-विघटनाला मात्र हातभार लावते. मराठी सत्तेच्या काळात गोंधळी पोवाडे गाऊन लोकजागृतीचे काम करीत होते.

वासुदेवाच्या गाण्याचा एक नमुना:


दान पावलं ऽ दान पावलं ऽ
पंढरपुरामंदी इट्टोबारायाला
कोंढणपुरामंदी तुळजा ऽ बाईला
जेजुरीमंदी खंडोबारायाला
सासवडामंदी सोपानदेवाला


(वरील गाण्याचा संदर्भ: भारतीय संस्कृतिकोश, संपादक: पं. महादेवशास्त्री जोशी, पृ. ६३१-६३२)

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 23, 2009

आंबा मोहरला शरदात

आपला परिसर : आंबा मोहरला शरदात





या वर्षी शरादातच आंब्याला मोहर आला. त्यानंतर दोन तीन दिवस पाऊस पडला. वाटले मोहराची वाट लागली. पण तसे काही झाले नाही. हे छायाचित्र टिपताना आणिक मोहर आला आणि पिटुकल्या कैरया पण दिसू लागल्या.

मुंबईत सहसा आंब्याची झाडे दिसत नाहित. इथे बहुतेक शोभेची (?) झाडे वाढवतात. काही लहान-मोठ्या मुलाना विचारून पाहिले पण त्याना ते झाड कसे दिसते माहीत नव्हते. आंबे जरी आवडीने खात असले तरी कुतूहल नावाची चीजच नाही त्याला काय करणार?

यात काय आश्चर्य! मी एकदा परदेशी विज्ञ्यान सप्ताहिकात वाचले, इंग्लंड येथील लोकाचा समज होता कापूस प्राण्यापासून पैदा होतो, जशी लोकर मेंढ्यापासून मिळते.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 16, 2009

वानसे जेथे वन्यजीवन तेथे वसे


एका कोळीयाने
गच्चीच्या कट्ट्यावर ठेवलेल्या कुंड्यांतली झाडे: कोरफड, ब्राम्ही, आवल्याचे रोप, तुळस, अबोली, गुलाब, इत्यादि. तेथे बांधिले एका कोळियाने जाळे. काही दिवसानी पाहिले तर ते नाहीसे झाले होते. कुणीतरी "साफसफाई" केली होती!

जेथे वानासांची जोपासना केली जाते तेथे सूर्यप्रकाश असतो -- असावा; पाण्याचा ओलावा असतो; विविध कीड़े, अळ्या, डांस, कीटक, माशा, मधमाशा, गांडुळे . आणि असंख्य जीवाणू (bacteria) असतात.

कोळ्याला उपजतच माहीत असते कुठे जाळे बांधावे. (घरातही कोळीष्टके असतात.) कधी कोळी भक्षक असतो, कधी तो भक्ष्य (विशेषत: रासायनिक कीट्कनाशकांचा बळी) होतो. निसर्ग - सृष्टी -- प्रकृति इच्या "पर्यावरण + पारिस्थितिकी + उर्जा" यांच्या संतुलनपूर्वक नियोजनाचा हा भाग असतो. पण माणसाराखा, विशेषत: इतिहासपश्च मानवासारखा (Post-historic man) अनिवार, अमर्याद भक्षक दुसऱ्या कोणत्याही योनीत (species) नसेल.

एकदा रस्त्याच्या बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मी भटकत होतो. पावसाळ्याचे दिवस होते. एके ठिकाणी डामरी रस्त्याच्या कडेला "NSS" या संस्थेचे स्वयंसेवक कामास लागले होते. काम काय? रस्त्याच्या कडेला मातीत नव्याने रुजलेली रोपती उपटून ते "साफसफाई" करीत होते.
नागरी संस्कृतीची सौंदर्याची कल्पना फारच विचित्र आहे, भोगवादी दृष्टीसुखाच्या लालसेने लडबडलेली, मग ते कोळ्याचे जाळे असो कि वर्षभर मातीत सूप्त असलेल्या बीजांतून उगवालेली रोपे असोत. ती वानसे वन्यजीवन एकमेकांचे पोषण - निर्वाह करीत असतात. पण लक्षात कोण घेतो!

वनस्पतींची उपज आणि जोपासना नियमित केल्याने शारीरिक व मानसिक स्वस्थ्याला मदत तर होतेच, पण नकळत ध्यानाला पण चालना मिळते. कारण साधे आहे, वानसे चर्पटपंजरी करत नाहीत. तरीही इथे संतत काहीतरी असते. एक अनोखा वास्तव चलतचित्रपट दिवसरात्र चालू असतो. इथे स्थूल स्तरावर (micro level) महान विश्व जमात (cosmic community) कार्यरत असते. येथे आपल्यातील व विश्वातील पंचमहाभूते दरेक भेटीत संपर्कात येतात.

वरील छायाचित्र अगदीच सामान्य आहे. तसेच वरचे लेखनही, सामान्य व रोखठोक. त्यात कोणत्याही प्रकारचे नाटय - अलंकार - काव्य नाही. आहे ते जीवनाचे नाटय - काव्य जे स्वत:च शोधायचे अन् अनुभावायचे. जे काही आपल्याला कळले वाटते ते आपल्या बोधन क्षमतेप्रमाणे (perception); ते वळतेच असे नाही.
शब्द - चित्र - ध्वनी असतात फक्त वास्तावतेचा आभास, केवळ मायावी वास्तवता.


~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 07, 2009

रेमीची मुक्ताफळे १४

रेमीची मुक्ताफळे १४


"निसर्गाचे मौन होते

जेव्हा
शीवाचे तांडव,

येते
सुनामीचा अवतार घेऊन."




(अधिक वाचा "मौनाचा ध्वनी : मौनाची सांगता")

-----------------------------------------------










टीप: चित्र-सदर्भ - "द ग्रेट वेव" चित्रकार कात्सुशिका होकुसाही (१७६०-१८४९) रंगित वुडकट


~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 05, 2009

मळलेल्या वाटा सुखाच्या

मळलेल्या वाटा सुखाच्या
कितिक कितिकांसाठी.
नव्या बोचाणारया, खुपणारया,
वादळ वाऱ्यात पुसल्या जातात;
डुबतात परस्पर विरोधी रंगांत.
कुणी शोधावे भग्नावशेष पुसल्या वाटांवर;
कुणी नवे दरवाजे आपलेसे करण्या.
असे कितिक काळाच्या उदरात
पुसल्या जाणारया वाटांचे भान नसलेले;
रंगी बेरंगी विश्व पाहून बेहोश झालेले.
अंत:काळ त्यांच्या पावलांच्या
खुणा फडक्याने विस्मरणाच्या
पुसत सरकत आहे पाठोपाठ:
ओढ़ आहे महाद्वाराची स्वातंत्र्याच्या
जिथल्या मार्गाना नाहीत
लांबी रुंदीच्या मर्यादा,
नाहीत अस्तित्वाची बंधने --
नाही अहंतेचा संघर्ष.
* * *

(वड़ोदरा | १९६९)

~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 01, 2009

रेमीची मुक्ताफळे १३



"
सर्जनशील (विधायक) निर्मितीच्या सामर्थ्याने

प्रस्थापित संकेतांचे अर्थ बदलतात - संकेत बदलतात.

"
अर्थातच विधायक निर्मितीत अण्वास्त्रे येत नाहीत.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

November 24, 2009

नागरता (civilization) इंडियावर मराठी लघुकविता

नागरता किंवा नागर-संस्कृती (civilization) ही लघु कविता इंडियाला उद्देशून आहे. ती सर्व जगाला पण लागू होऊ शकते.
- - -


- - -

आमची देशभक्ति केवळ तळ हातावर मावेल एवढ्या नकाशापुरती नाही. ती ज़मीन, पाणी व माणसा सह समस्त जीवमात्राला सामावते.

उदे उदे करतो आम्ही "पर्यावरण (environment) + पारिस्थितिकी (ecology) + ऊर्जा (energy)" यांचा निसर्गाने दिलेला अतिप्राचीन, अलिखित मूल धर्मं नियम, जो मानव-निर्मित सर्व वस्तू आणि कल्पना-संकल्पना यापेक्षाही सर्वश्रेष्ट आहे, मग ते कला आणि शास्त्रे, धर्म आणि तत्वज्ञाने असोत.

आम्हास जाणीव आहे, नागरतेने वेळोवेळी निर्माण केलेल्या भौतिक / ऐहिक सीमा बदलाच्या अधीन आहेत. एवढेच नव्हे तर पृथ्वीच्या इतिहास काळापासून जमीन व पाणी यांच्या प्राकृतिक सीमा पण संतत बदलत असतात.

टीप:

ही कविता मूळ इंग्रजी "Civilization" या कवितेचे भाषांतर आहे. काही सेवाभावी संस्थानी "राष्ट्रीय एकत्माते" साठी गांधी जयन्ती २००० दिवशी मुंबईत मिरवणूक, व ती "आगस्ट क्रांति उद्यान" येथे सार्वजनिक सभेत परिवर्तित झाली. त्या घटनेत सामिल होण्यासाठी जाताना लोकल ट्रेनमध्ये मूळ इंग्रजी कविता मी लिहिली होती.

ही प्रसिध्द करावयास गांधी जयंतीच्या दिवसाची वाट पहायची मला गरज वाटत नाही.


रेमी डिसोजा
मुंबई

~ ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

November 16, 2009

चुकतात माझी गणिते केवळ



 घड्याळाचे  जागतिक महाभारत


लेखक: रेमीजीयस डिसोजा 


नेमेची सूर्योदय रोज पाहता
चुकुनच कधी येई ध्यानी
माझ्या विचारांच्या गतीहुनी
अफाट आहे धरतीची गती
नि
सूर्य रोजच्या रोज जागा बदलतो,
उगवायची वेळ बदलतो, ऋतु बदलतो,
कधी रात्र मोठी कधी दिवस,
वारयाची दिशा बदलतो;
नि
मी मात्र असतो जागच्या जागी
धावता धावता अधांतरी फिरत्या
प्रचंड चक्राच्या परिघावर वेगाने.
तरीही रोजच्या रोज सूर्य सांगे,
बा रेमी,
ही तुझी घड्याळाची टिक टिक
जळवेसारखी चिकटलेली तुला
आहे एक हुलकावणी देणारी
वादग्रस्त संकल्पना केवळ.
नि
कितीही आटापिटा केला तरी
चुकत नाही काळ; परी
लिहिलेली एक रेषेवर सरळ
चुकतात माझी गणिते केवळ
नेमेची.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

November 11, 2009

आंतरजाळें एक अत्यंत महागडे माध्यम

धन दौलत काही सरकारी - गैरसरकारी टाकसाळीत तयार होत नाही.  वापरात असलेले चलन मुळातच मायावी धन आहे. त्याची व्यवहारातली किंमतहि मायावी असते; स्थळ - काळाच्या संदर्भात ती अधिक - उणी होते. या चढ़ - उतारात भ्रष्टाचाराचा वाटाहि काही कमी नसतो. भ्रष्टाचार सत्तेला सांगतो, "तुझे पान तेथे माझा द्रोण".  

या द्रोणाचा आकार - घनता पानापेक्षा मोठे होतात तेव्हा बलाढ्य साम्राज्ये पण डुबतात. अगदी अलीकडच्या काळातले उदाहरण द्यायचे तर आहेत ब्रिटिश साम्राज्य किंवा सोविएत रशिया. 
सत्ता आणि भ्रष्टाचार यांचा संबंध ऐतहासिक काळापासून फार घनिष्ट आहे.   


आधुनिक काळात संगणकाचे साम्राज्य पण आता जागतिक स्तराला पोहोचलेले आहे. 
संगणकाचा विचारही डोक्यात आला की आगीच्या बंबाप्रमाणे धोक्याची घंटा चित्तात वाजू लागते; भजनाच्या नाजूक चिपळ्या नाहीत वाजत. 
संगणित्राच्या कळफलकावर टिचकी मारली कि डोक्यात घणाचे घाव आघात करतात. 


आंतरजाळ्यावरचे सर्व माहिती भांडार कुठून येते, कुठे जमा होते, कुठे जाते, आणि त्यासाठी किती ऊर्जा खर्च होते याला तर सीमाच नाही. लक्ष...कोटी... अब्ज... खर्व... निखर्व... सारी परिमाणे थिटी पडतात. 

एका संगणित्रापासून ते दुसऱ्या पर्यंत, फुकटात मिळणारी "इ-मेल" फिरते तारांच्या जाळ्यांतून, महासागराच्या तळाशी  ठेवलेल्या केबलमधून, अंतराळात फिरणार्या  अवकाशयानातून, केंद्र भांडार इ. एवढा सारा प्रवास करते. या सर्व जंजाळातील किती भाग मायावी वास्तवता निर्माण करण्यात गुंतलेला असतो याला काही सीमाच नाही. 


प्रागैताहासिक काळात मानव सर्व जगभर फिरला. वस्तुविनिमयातून इतर जमातीशी व्यवहार (व्यापार?) केला. कृषी क्रांती सर्व जगभर नेली. आजही काही जमाती अश्मयुगात जगतात.  
आजही मेधा पाताकारने एक हाक दिली की डोंगर दरयातून रानोमाळ पसरलेले आदिवासी ठरल्या दिवशी, ठरल्या जागी, ठरल्या वेळी पायी चालत येतात व एकत्र होतात. 

कागदाच्या नोटा व धातूंची नाणी आता चलन म्हणून वापरली जातात, ज्याना स्थायी मूल्य नाही. म्हणून  का सोने चांदी वापरायची? कागद - धातू - सोने - चांदी - सर्वच संपदा शेवटी पृथ्वीच्या गर्भातूनच यायची ना? 

अशी ही कथा इतिहास-पश्च मानवाच्या पुच्छ प्रगतीची; ज्याला अजून आदिम जीवानशैलीच्या दर्जाचा पर्याय गवसलेला नाही. 

अन् हे सारे लिहिताना की-बोर्डावर टिचक्या मारीत मी माझा अंहकार गोंजारतो. 



~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

November 07, 2009

धरतरी

धरतरी

तुझ्या अस्तित्वाचा मोहोर
सुगंध वाऱ्यावर
चंद्र तारकांच्या किरणांवर
हरवते महानगर


तुझ्या संगीताचा मोहोर
फुलतो आठही  प्रहर
दाही दिशा अनावर
चिरंतन समागम


तुझ्या आठवणीचा मोहोर
फुलतो रोमांचकारी
तीनही काळ रंध्रारंध्रावर
काळ काम वेग होतात स्थिर


तुझ्या हास्याचा बहर 
रानोमाळी कडेकपारीं
रेताडातून मध्यानी
सरस्वती येते वर


तुझ्या मौनाचा मोहोर
पुलकित सदाबहार
केसांच्या अग्रांवर
सदोदीत चमत्कार


चिमण्या पतंग फुलपाखरे
रंग तरंग माती धोंडे
तुझ्या अस्तित्वाचा साक्षात्कार
महाकाव्य रस्ताभर


तुझ्या नृत्याचा उल्लास सदाबहार
वृक्ष वेलींच्या माथ्यावर
बरसणारया ढगांवर
सुकदुकीचा सदा विसर


अनुभूतीचे सारे थर
पृथ्वी आकाश पाताळ
अस्तित्वाच्या पार
तुझी सय अपरंपार


अनादी अंत महोत्सव
आनंदाचा गजर गजर
आनंदी आनंद आनंदी आनंद
आनंदी आनंद आनंदी आनंद...

* * *
"सुकदुक" (कोंकणी), सुख दुःख
- - - - - -
स्थळ: मुंबई
काळ: २८ - - १९९९
- - - - - -
धरतरी झाली माझे माता पिता गुरु.
--- रेमी डिसोजा
गुरु पौर्णिमा (१८..२००८)

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

November 03, 2009

लोकगीतांचा मागोवा-२: लोककला आणि अभिजात कला शैली

१.
पंडित कुमार गंधर्व यांची स्फूर्तीदायक आठवण मनात नेहमीच ताजी असते. पंडितजीना त्यांच्या शास्त्रक्रियेनंतर काही वर्षे गायचे नाही असे सक्तीचे पथ्य पलावे लागले. त्या पथ्याच्या काळात ते माळव्यात खेडोपाडीफिरले व अनेक लोकगीते ऐकली - जमा केली.
आणि समकालीन अभिजात संगीताने पंडितजींच्या हिंदुस्थानी गायकीचा नवा आविष्कार अनुभवला. लोक-गीत-संगीताने पुन्हा एकदा अभिजात कलाशैलीत नव्याने पदार्पण केले. (अधिक वाचा: Masters of Timeless Architecture)    

लोकगीते - सर्वच लोककला - यांच्यात अभिजात कलाशैलींचा उगम आहे हे सर्वमान्य आहेच. पण विसाव्या - एकविसाव्या शतकांत असे क्वासिताच घडते. (बॉलीवुड सिनेमाबद्दल न बोललेले बरे.) 

आर्किटेक्चर (वास्तुविद्या किंवा वास्तुउद्योग) [टीप १] या क्षेत्रात शंकर निवृति कानडे, आर्किटेक्ट (वास्तुविद), आता बंगळूर निवासी, याने या क्षेत्रात लोककलेचे अभिजात वास्तुमध्ये परिवर्तन केले. त्याने संशोधित केलेले बांधकाम "छापडी" पध्दति या स्थानिक भाषेतील नावाने कर्नाटकात ओळखली जाते.

माझा लहानपणापासून अनुसूचित जाती-जमातिंशी -- धनगर, महार, चांभार, कोष्टी, कुंभार, सुतार, गवंडी, सोनार, लोहार, इ. --  संपर्क आला. यानंतरच्या काळात कातकरी, ठाकर, वारली, डांगी, भिल्लांच्या वेगवेगळ्या जमातीं मध्ये वेळोवेळी सुमारे तीस वर्षे फिरलो- राहिलो. या काळात त्यांची वास्तु व जीवन शैली पाहिली. त्याचा प्राथमिक आढावा मी "Tribal Housing: Buddha and the Art and Science of Karavi Hut" या संशोधित निबंधात घेतलेला आहे. मी वास्तुमध्ये कोणतीही क्रांति केलेली नाही. मात्र अनेक वर्षांच्या संपर्काने माझी जीवन शैली मात्र बदलली.  
*   *   *

टीप १:  इथे आर्किटेक्चर याचा संदर्भ पाश्चिमात्य पध्दतिशी आहे. जो फरक एलॉपथी व आयुर्वेद यात आहे तसाच आर्किटेक्चर व इंडियन वास्तुशिल्प यात आहे. अर्थात दोनही "वास्तु" आहेत. आधुनिक विलायती वास्तुचा उगम औद्योगिक क्रांतिमध्ये आहे. आणि त्याची मुळें ग्रीक व रोमन वास्तुमध्ये आहेत. इंडियात आलेले आधुनिक आर्किटेक्चर म्हणजे विलायती आधुनिक वास्तुच्या  पुच्छाचे टोकच म्हणा ना. 
गेल्या दशकाच्या काळात आर्किटेक्चर म्हणजे सृजनशील उद्योग (creative industry ) समजले जाते. त्यामुळे त्याला वास्तुशिल्प किंवा वास्तुकला म्हणने आतातरी योग्य ठरणार नाही.  

~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 30, 2009

मुक्ताफळें -१२




"निवारा जेथे घर वसे; घर जेथे हृदय वसे."

तुझ्या पैशाने तू निवास विकत घेऊ शकतोस, पण पैसे घर-कुटुंब विकते घेऊ शकत नाहीत.



(मूळ इंग्रजी कविता)

मुंबई महानागारीच्या रस्त्यावर मी जेव्हा उतरतो तेव्हा लक्षावधी विस्थापित कुटुंबे नजरेस पडतात. (कारण साधे आहे: कधी मी आर्किटेक्टचा व्यवसाय करीत होतो. कधी शिक्षक होतो. कधी जमीन नसलेला शेतमजूर होतो. कधी मीपण विस्थापित होतो. फक्त शिक्षणाची वेळीच संधी मिळाली. हे सारे लोक देशाच्या सर्व प्रदेशातून आलेले आहेत; जेथे जेथे मुंबईचे पदचिन्ह उमटले तेथून. ही गोष्ट राजकर्त्याना नजरेआड करून चालणार नाही. मुंबईत वसलेल्या देशी - परदेशी भांडवलदारांची ऐपत त्या सर्वाना गुलाम म्हणून विकत घेण्या इतपत आहे. पण जेथे सुशिक्षित गुलाम मिळतात तेथे त्याना कोण विचारतो?



टीप: मी काढलेले वरील छाया-प्रकाश-चित्र कलेचा नमुना नाही. असे चित्रण मी फक्त नोंदणी साठी वापरतो. "कलेसाठी कला" मी मानीत नाही.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 27, 2009

मुक्ताफळें - ११


मुक्ताफळें हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल, नि आवळ्याची तुरट चव!


"ज्यानी निसर्गाशी संवाद साधून जगणे अनुभवले नाही त्याना नैसर्गिक मरण कसे येणार!"

क्रमश:
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 22, 2009

मुक्ताफळें - १०


मुक्ताफ्ळें हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल! इतर भाषांतही अशी मुक्ताफळें असतील; त्याना काय म्हणतात माहीत नाही. इंग्रजी भाषेत aphorism हा शब्द जवळचा आहे, प्रत्येक भाषेच्या स्वत:च्या छटा असतात.


"सर्वानाच खुश कसे करणार? त्यासाठी विदूषक व्हायला लागते."

(काहीना हा ब्लॉग, ही पोस्ट आवडतील अथवा आवडणार नाहीत. कुणी टिप्पणी करतील; कुणी इतराना कळवतील, कुणी चूका नजरेस आणून देतील, कुणी सबस्क्राइब करतील; आजच्या धकाधकीच्या जीवनाला अनेक कंगोरे आहेत हे मी लक्षात घेतो... सर्वांचे स्वागत आहे. धन्यवाद. )


रेमीजीयस डिसोजा
~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 12, 2009

मुक्ताफळें - ९


मुक्ताफळें
हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल.


झाडांवर लक्षावधी पाने असतात. प्रत्येक पानाच्या शिरा (bar-code by Nature) एकमेवाद्वितीय असतात. तरीत्यांच्यापुढे व्यक्तित्व-पेचप्रसंग (identity- crisis) उद्भवत नाही.


(उद्या महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आहे. लोक मूर्ख नाहित. कुणालाच बहुमत मिळणार नाही याची खात्रीआहे. मग खरेदी-विक्रीचा बाजार सुरु होईल. निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या माथ्यावर पण त्याची किंमतलिहिलेली असणार, जशी शर्यतीत धावणारे घोडे, IPL चे  क्रिकेट खेळाडू,  चोर दरोडेखोर वगैरेंच्या डोक्यावर लिहिलेली असते. दरेक निवडणूकीत अशीच निकाल येत आहेत. पण हरघडी प्रांतांच्या व केंद्र सरकारच्या निवडणूकींच्य  निकालांपासून कुणीच कसा धडा शिकत नाही? कधी हे तथाकथित पुढारी आपला हेकेखोरपणा सोडून कधी लोकाभिमुख होणार?) 


-- रेमीजीयस डिसोजा
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 09, 2009

मुक्ताफळें - ८


मुक्ताफळें हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल!


अनुभवाची मुळें व्यक्तिगत वातावरणाच्या चारित्र्यात खोलवर रुजलेली असतात.


रेमीजीयस डिसोजा
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 05, 2009

मुक्ताफळें ७


मुक्ताफळें हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल!


काम नाही, उद्योग नाही... असे कधी झालेय?
स्वस्थ पडून रहा आणि शोध घे.

क्रमश:

रेमीजीयस डिसोजा
~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 01, 2009

त्याना देवकळा पाषाणाची

त्याना देवकळा पाषाणाची 
नेते महात्मे समाजधुरंधर  
अरे परमेश्वर तर कधीचा गेला 
पाषाण होवून राहिला
मीच आहे ब्रम्ह म्हणून 
इमान राखावे स्वत:शी. 



त्याना देवकळा पाषाणाची 
संत महंत संस्क्रुतिंचे आधार 
मी आहे ना जीव हाडामासाचा
इमान राहू दे जिवाशी-जीवनाशी



त्याना देवकळा पाषाणाची
पोथ्या पुराणे दर्शने  
धरतीची लेकुरे आम्ही 
आम्ही प्रेषित आमच्या जिंदगीचे 
मी आहे पूत मातीचा 
शपथ आहे रक्ताची. 

ऋतु वर्षांचे चक्र चक्र
परंपरा संस्कृतिंचे 
त्या वाळवंटात हौतात्म्य 
पिचत राहिले मानवतेचे 
त्या बलिदानाशी 
इमान राहु दे.
*    *    *

 (स्थळ: वडोदरा
सन: १९६७)

 
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

मुक्ताफळें - ६


मुक्ताफळें
हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल!


पुढची पाच मिनिटे वाट पहाण्यात कधीच निघून गेलेली आहेत!


क्रमश:
रेमीजीयस डिसोजा
~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 28, 2009

मुक्ताफळे -५



 

"सृष्टी आहे म्हणून मी आहे" हे रेमीचे मुक्ताफळ शास्त्रातील किंवा विज्ञानातील काही प्रमेय किंवा संकल्पना किंवा समीकरण नाही. नाही ते तत्वज्ञान.  ही साधी गम्य वस्तुस्थिति आहे.


 एका विलायती फिरंग्याचे प्रसिध्द मुक्ताफळ इंग्रजी पुस्तकात अनेकदा उध्दृत केलेले आठवते: "I think , therefore , I am ". मला या महाभागाचे नाव वा काळ अथवा देश आठवत नाही. कुणाच्याही ध्यानात येईल हे विधान किती उध्दट अहंमन्य आहे!

विचार, तर्क हे फार उपयुक्त  साधन आहे. आणि ते प्रत्येकाने वापरावयास हवे. पण तर्क हा शेवट पर्यंत न्यायला हवा असतो, अगदी तो मरेपर्यंत, मरण जे अटळ आहे. मग कुठे विधायक सर्जनशील विचार आणि कृति शक्य होते.

याच्यातून काय कृति निष्पन्न होईल त्याची खात्री नाही. कदाचित ती "निष्क्रीय-क्रिया" असेल. मग तर फारच उत्तम. मग सृष्टीवरचे, पर्यायाने सर्व जीवमात्रावरचे अत्याचार संपतील, निदान कमी होतील. त्यालाच खरीखुरी सुधारण व प्रगति  म्हणता येईल.       



~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 21, 2009

मौनाचा ध्वनी : मौनाची सांगता

पाखरांची किलबिल, पाचोळ्याची सळसळ, ढगांचे बरसणे, फुलांचे सुगंध, फळांच्य चवी, हवेची झुळूक... सारे किती रमणीय, किती सुंदर, किती काव्यमय! सारेंच सृष्टीची अभिव्यक्ति.


यापेक्षाही सृष्टीचे मौन अनेक पटीने मोठे, फार मोठे, आहे. असे सांगतात, वसुंधरेच्या उदरात सतत उकळणारा तप्त रस आहे. पण वसुंधरेचे मौन आपणास जाणवते ते जेव्हा आपल्या पायाखालची जमीन हादरते, जेव्हा ज्वालामुखी उफाळतात, जमीनी पाण्याखाली जातात, पर्वत वर येतात...

सागराच्या पाण्यातील बिंदू खालून वर, वरून खाली सतत फिरतो, शीत / उष्ण प्रवाहातून जगभर हिंडतो, वाफ होऊन आकाशात जातो... हे सारे जाणवतेच असे नाही. (बहुतेक वेळा ते पुस्तकात राहते.) यातील मौनाची जाणीव होते जेव्हा आकाशातून विजेचा लोळ कडाडत उतरतो वाटेत येणारे खाक करीत, सुनामीची महालाट जमीन धुवून काढते... तेव्हा.

असेच काहीसे होते जगातील अफाट जनसागारांचे. त्यांचे मौन तरी कुठे ऐकू येते राजजकर्त्याना? केवळ यादवी युध्देच का त्याना जागे करायला हवीत जी होत आली अल्ल्याड पल्ल्याडच्या काळात?

माझ्या जगण्याच्या सर्वसामान्य स्तरावर घडणार्या घटना - बोलणे - वाचणे इ. अगणित प्रसंगी यांचे पण असेच काहीसे होत.

शब्द... वाक्ये... परिच्छेद... यामधील अंतरें "मोकळ्या" जागा नसतात, ते पण "मौन" असते. हे मौन ऐकू आले तर बरेच काही अध्याहृत असलेले उघडे होते: अंहकार, पाखंड, हेत्वाभास, दंभ, क्लेश, कारुण्य...

कोणती अभिव्यक्ति विधायक की विघातक सर्जनशीलता आहे याचा कस लागतो जेव्हा मौनाचा ध्वनी ऐकू येतो. उदाहरणार्थ, अण्वास्त्रे, किंवा आता अणु उर्जा, विघातक आहे की विधायक आहे हे कोण ठरवणार? आजच्या आधारलेला सुधारलेल्या पण अवनत नागर समाजातील निर्मिति करणारा, विकणारा की विकत घेणारा?

मौन ऐकणे असेल तर मौन पाळणे पण आले. (काही समाजात, मर्यादित कालासाठी का होईना, मौन पाळण्याची प्रथा आहे.) " मौन" (silence) म्हणजे "गप्प" (silent) राहणे नव्हे. डोक्यात जर कुरव कहर असला तर ऐकू काय येणार? , बोललेले - वाचलेले पण ऐकू येणार नाही. फक्त आपले पूर्वग्रहच येणार. व आपण "जैसे थे" यापुढे जात नाही.
यास्तव मौन पाळणे आवश्यक असते. पाहताना - वाचताना - ऐकताना आपल्या व्यक्तिगत आवडी - निवडी, पूर्वाग्रह यावर आधारलेला न्याय-निवडा बाजूला ठेवणे ही प्राथमिक गरज आहे. मग साकल्य- (holistic) दृष्टी - विचार - विवरण शक्य होते अन सुरू होते. मग मौन ऐकू येते, मौनाची सांगता होते.


- - - - -
टीप: चित्र-सदर्भ - "द ग्रेट वेव" चित्रकार कात्सुशिका होकुसाही (१७६०-१८४९) रंगित वुडकट।
मला वाटते कलावंत हे सर्रास मौन पाळतात. अर्थातच कलावंत त्यांच्या युगांची नाडी बरोबर ओळखतात.

~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

मुक्ताफळें - ४


मुक्ताफळें
हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल!


संस्कृतिंच्या वावटळींत ह्रुदयातली कळ जपावी.



क्रमश:
रेमीजीयस डिसोजा
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 20, 2009

मुक्ताफळें - ३


मुक्ताफळें
हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल!


निसर्गाचे
मौन (ऐकू येत नाही तेव्हा) शिवाचे तांडव सुनामीचा अवतार घेऊन येते.

क्रमश:

रेमीजीयस डिसोजा
~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 19, 2009

मुक्ताफळें - २



मुक्ताफळें
हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल!

आज सवड आहे पण वेळ नाही.
काल वेळ होता पण सवड नव्हती.

(यातला सूचित प्रश्न कसा सोडवणार!!)
क्रमश:
रेमीजीयस डिसोजा,
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape