November 22, 2011

घायपात बहरे मुंबई शहरी

घायपात बहरे मुंबई शहरी

फोटो १- घायपात, मुंबई
अलभ्य लाभ ! मुंबईत रस्त्याच्या चौकात हे वानस बघायला मिळणे दुर्मिळ, आणि शहरातपण कुठेही. कुणी समंजस कलावंताने त्याचा उपयोग उपवन वानस म्हणून केला होता. तोही सुबक रीतिने : वहानवाहक व पादचारी यांच्या दृष्टीला अडथळा न आणता.

आणि मी पाहिले माझ्याशिवाय तेथे आणखीही कोणी होते. त्या होत्या छोट्या मधमाशा, घरमाशीपेक्षा लहान. मी फोटो घेत होतो, त्या मध घेत होत्या.

घायपात त्याच्या मजबूत तंतूसाठी प्रसिद्ध आहे. आणि खेडूत त्याचा यथायोग्य उपयोग करतात. भारताच्या जैविविधतेत तंतू देणारी अनेक वानसे आहेत : माड, कपास, अंबाडी, भेंड. शेवरी, केळ, अननस, ताग इत्यादि.

घायपाताच्या पानांतून तंतू मिळतात. तर अंबाडीच्या फाद्यांतून ६-८ फूट लांब तंतू काढता येतात. शेतकरी, कोळी, आदिवासी इ. लोक यांच्यातून मासेमारीची जाळी विणतात.

हे दोर सिंथेटिक दोरापेक्षा अधिक टिकाऊ असतात. हीं जाळीं जेवढी पाण्यात भिजतात तेवढी अधिक मजबूत होतात. या उलट सिंथेटिक दोर व जाळीं कोरडी राहिली कि कांही दिवसांनी आपोआप विशीर्ण होत जातात.

फोटो २- घायापाताचा फुलोरा, मुंबई
या चित्रातील घायपात बंदिस्त जागेत वाढवलेली उपरी वानसे आहेत. यांचा फुलोरा पाहिला कीं कुणाच्याही ध्यानात येईल हीं झाडें बाहेरून दिलेल्या खत-पाण्यावर पोसलेलीं आहेत. त्यांना जमिनीतून काहीही पोषण मिळत नाही. थोडक्यात हीं परावलंबी झाडें आहेत.

या पर्यावरणाचा त्यांच्या वाढीवर परिणाम झाल्यावाचून कसा राहिल ? नैसर्गिक मोकळ्या अवस्थेत यांची पाने पांच फूटाहून अधिक वाढली असतीं.

पिंजर्‌यातले पक्षी, कांचेच्या टांकीतले मासे, कुंडीत लावलेलीं झाडें आणि मुंबईच्या फूटपाथवर लावलेली शोभेची झाडे यांचे पण असेच होते.

मग आपलें - शहरवासियांचें - काय होत असेल बरें? हीं शहरें आमचें व्यक्तिस्व सर्वार्थाने शारीरिक, मानसिक (व आत्मिक) बहरायला, फुलायला कारणभूत होतात का?

असे हे प्रश्न माझे मीच स्वतःला विचारायचे, आणि उत्तरही मीच शोधायचे. गंमत अशी : या प्रश्नांतच त्यांचे उत्तर आहे !

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

No comments:

Post a Comment