May 02, 2011

नेता ऽ गिरी ऽऽ

सृष्टीयोग
विज्ञान युंगात सृष्टीची अनेक अंगे माहित झाली
पण त्याबरोबरच तथाकथित पुरोगामी समाजाची निसर्गापासून फारकत पण होत गेलीय.
आणि माणसांची माणसांपासून.
इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे, 'किंग ईज डेड, लॉंग लीव द किंग' - राजा मेला, राजा अमर रहो! राजेशाही गेली. लोकशाही आली. आणि राजे लोकांची जागा पुढारी लोकांनी घेतली.

   हे झाले विशेषतः नव्याने आलेल्या लोकशाहींत. तसं पाहिल्यास जगातील प्रस्थापित लोकशाही देशपण याला अपवाद नाहीत. वासरांत लंगडी गाय शहाणी म्हणतात ना! नवे पुढारी तयार करण्यासाठी किती संस्थांचा, विद्यापिठांचा केवढा आटापिटा चाललाय काही विचारूं नका.

   रानडे - गोखले - गांधी - विनोबा यांची गुरूशिष्य परंपरा अनुभवाच्या पाठशाळेत, क्षेत्रिय अभ्यासांत (field study) कधीकाळी तयार झाली होती.

   आता पाठ्यक्रम तयार झालेत. पुस्तकी अभ्यासक्रम, वर्गाच्या चार भिंतीआड, अधूनमधून नमुन्याचे सर्वेक्षण, आणि तशाच धर्तीच्या देशीविदेशी पदव्या घेऊन आलेली प्राध्यापक मंडळी शिकवायला; अशी असते या पाठ्यक्रमाची रूपरेखा.

   अरे हो! आणि हमखास मदतीला आंतरजालाचे (Internet) प्रतिविश्व आहेच. त्यातली किती माहिती कधी कालबाह्य होईल हे कोणालाच, खुद्द लेखक / संपादक मंडळीलापण माहित नसते.

   मात्र प्राकृतिक जैवविविधतेत स्थानिक जळ, जीवन व जीव ही अनन्यसाधारण असतात; पर्यायाने त्यांच्या प्रभावाने स्थानिक लोकसंस्कृतिपण.

   ही वस्तुस्थिती किती पुढारी किंवा नेते ध्यानात घेत असतील याची शंकाच आहे. कारण ते शालेय शिक्षणाच्या एकसंवर्ध मशागतीत तयार झालेले असतात. आणि सृष्टीला मानवीय अधिश्रेणींची तमा नसते.

   सृष्टी कधी तथाकथित प्रगत नागरतेने निर्माण केलेली 'तृतिय पारिस्थितिकी' (Third Ecology) ओळखत नाही. तिच्यापुढे नेते महात्मे सारे नगण्य !

   आतापर्यंत सृष्टीची समज येण्याइतपत विज्ञान प्रगत झालेले आहे. खरं पाहता नि:पक्ष, विनापूर्वग्रह दृष्टीने कुणासही ही वस्तुस्थिती दिसेल. त्यासाठी विज्ञानादि शास्त्रांच्या मान्यतेचीपण गरज नाही.

   पण पांच हजार वर्षांच्या नागरी संस्कृतिच्या विचारधारेच्या संवयीने हे आमच्या गळी उतरणे सहजी शक्य नाही.

   शरद्चंद्र चटर्जींच्या (१८७६ - १९३८) स्पष्ट, रोकड्या शब्दांत सांगायचे तर :
'ही सारी बडबड - ही दर्शनशास्त्र वेदांताची बोली - हे नुसते शब्द - या शब्दांच्या जोरावर जग चालत नाही' (भैरवी - 'देना पावना', आ. १९६२ पृ. २१६).
   सृष्टीच्या लेखी समाज, धर्मसंस्था, राज्यसंस्था, अर्थसंस्था, राष्ट्रवाद, देशभक्ती, नेते-पुढारी, इत्यादी, किंबहुना निसर्गावर 'मानवी सत्ता' या शब्दांना काही अर्थ असू शकतो का?

टीप:१.  भैरवी (मराठी शीर्षक) - 'देना पावना' (कर्ज आणि तहशील) या कादंबरीत (१९२३) शरदबाबूनी शंभर वर्षांपूर्वीची देशातील खेडी, खेड्यांची व तेथील उच्चभ्रू व ग्रामिण-दलित समाजाची अवस्था वर्णन केलेली आहे. या कादंबरीचे भा. वि. वरेरकर यांनी १९४२ साली मराठी भाषांतर केले.
२.    आजच्या परिस्थितीचे आम्हीच साक्षी! फक्त आपल्या डोळ्यांवरचे वाद - विवाद - प्रतिवाद - युक्तिवाद - अपवाद... इ. चष्मे काढून बाजूला ठेवायचे व साकल्याने बघावे! एवढेंच!
३.   सृष्टीयोग हा काही कंपू नव्हे. प्रत्येकाचा सृष्टीयोग वैयक्तिक - स्वतंत्र मार्ग आहे.
 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

No comments:

Post a Comment