August 05, 2010

इंडीयन आयडॉल ५ (Indian Idol 5)

सूचक शब्द: लोककला, मायावी वास्तवता, संस्कृती, आदिवासी    


इंडीयन आयडॉल ५ दूरचित्रवाणीवर चालले आहे. मी स्वरूप खानचे राजस्थानी लोकगीत ऐकतो. आणि हेलावून जातो. मी अवकाशात उचलला जातो, उंच उंच थरावर, कितीतरी वर्षांनंतर.
मी डोळे मिटून घेतो. टीवी च्या पडद्यावरील रोषणाई नजरेआड करतो.
वाळवंटात दूरवर जाणाऱ्या गाण्याच्या ताना मी अंतर्यामात पाहतो, ऐकतो. माझा "देस", माझी धरतरी, माझे अनामिक लोक,  सारे काही नजरेत येते. सर्व अंगांगाला स्पर्श करतात. गंगा यमुना मुक्त होतात.
मनोमन मी आशा करतो, येणाऱ्या काळात स्वरुपचे आणि त्याच्या लोककलेचे बॉलीवूडच्या मायावी
वास्तवापासून रक्षण होऊदे, त्यांना टिकून राहूदे.
एक काळ असा होता जेव्हा लोककलेतून अभिजात कला जन्मल्या आणि वाढल्या, इथेच नव्हे, सर्व जगभर. आता फक्त  कलेच्या नावाने वारंवार विडंबन आणि विटंबना पाहायला मिळते. आता मानलेल्या गुरूंची नक्कल बघायला मिळते.
हा काळाचा नव्हे मुक्त बाजाराचा (फ्री मार्केट) महिमा आहे. 


इथे इंडिया शब्दाचा अर्थ "प्रथम  जगत इंडिया" जेथे "तृतीय जगत इंडिया" व "चतुर्थ जगत इंडिया" (आदिवासी व वनवासी जमाती) यांना स्थान नाही. तरीही बहुविध जन माध्यमामुळे स्वरुपसारखे तरुण आपले नशीब अजमावयास येतात. इतर वाहिन्यावर  असे तरुण अधून मधून बघायला मिळतात. समता फक्त घटनेत लिहिलेली आहे. ती कधी अस्तित्वात येईल याचे भाकीत कोण करू शकेल?   

प्रथम जगत इंडियाचे नागरिक कालही अल्पसंख्यांक होते, आणि वाढत्या लोकसंख्येबरोबर आजही आहेत. सत्तेचे - आर्थिक, राजकीय, सामाजिक - लगाम जोवर त्यांच्या हातीं आहेत तोवर समता व लोकशाही कल्पलोक राहणार. 
दुसरी गोष्ट: इतर स्पर्धकांबद्दल काय सांगणार? ते सर्व धादांत नकलाकार! Crafty!! अर्रर्र, न-कलाकार!!! नकली  मालाला बाजारात फार मागणी आहे म्हणतात.   

टीप: छायाचित्रे - १ वारली आदिवासी मुंबईच्या मागील दारी राहतात. यांच्यावर इंग्रजीत लिहिलेला संशोधन निबंध माझ्या ARCHETYPES INDIA या ब्लॉगवर प्रसिध्द केलेला आहे (दुवा).
२ भिल्ल आदिवासींच्या होळी उत्सवावर व आदिवासी लोकजीवनावर
सचित्र पोस्ट याच ब्लॉगवर पहा (दुवा). 
३ ही सर्व छायाचित्रे व लेख माझ्या मते "मायावी वास्तवता" आहे, यांचा अर्थ आपण आपापल्या बोधानेप्रमाणे समजतो. 

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

No comments:

Post a Comment