August 14, 2010

आईने दिलेले बाळकडू

आमची आई बाळपणी आम्हा भावंडाना "बाळकडू" देत असे. अनेक वनौषधी एकत्र करून, कुजवून (fermetation) ती स्वत:च बाळकडू घरी तयार करायची. हे मला माहित कारण मी माझ्या लहान भावंडांच्या वेळी पहिले होते. पहिले मूल झाले तेव्हा तिचे वय जेमतेम १८-१९ असेल.

हे बाळकडू तेव्हा बाजारपेठेत सीलबंद बाटलीत तयार मिळत नसे. असल्यास माहित नाही. निदान खेडेगावात तरी नाही. तो तर परंपरेने आलेला आजीचा वारसा. त्याच्यावर बौद्धिक मालकी हक्काचे लेबल नव्हते.

गोऱ्या कातडीच्या फिरंग्यांनी -- त्यानंतर त्यांच्या देशभक्त देशी चमच्यानी -- त्या परंपरेची कधीच विल्हेवाट लावली; अजूनही चालू आहे.त्या
बाळंकडूची चव कधीतरी अनुभवाच! कडू-आंबट-तिखट-तुरट अशी त्याची मिश्र चव असते. माझा देशाभिमान मला आठवण करून देतो: जशी संस्कृती -- विद्या-कला-दर्शने-धर्म इ. -- जळ आणि जमीन यांची देणगी आहे तसेच "बाळकडू पण.

वनविनाशाबरोबर "बाळकडू" गेले, पाणी गेले, जमिनीचे रेताड होत चालले, नैसर्गिक पर्यावरण नाहीसे होत चालले, पारंपारिक लोकाविद्या - लोककला नाहीशा होत चालल्या.राहिले रुपेरी पडद्यावर व टीवी अन पीसीच्या स्क्रीनवर त्यांची व्यंगचित्रे, आणि उथळ उत्श्रंखल घोषणा आणि हर्बल उत्पादनाची जाहिरातबाजी!. त्यांच्या निर्मात्यांना आता वारंवार चित्रणासाठी परदेशी जायला लागते!! 
     
कोणत्या परंपरांचे संवर्धन - संधारण करणार? संस्कृती - परंपरा वस्तूंत नसतात, त्या लोकजीवनात असतात. एकशेवीस कोटी माणसांच्या लोकजीवनचे संवर्धन - संधारण कोण व कसे करणार? दिल्ली-मुंबई येथे कायदे करून का ते होणार? कि मिडिया करणार? ते केवळ वादंग माजवतात, उर्जेचा विनाश करतात. माझा हा ब्लॉगपण याला कदाचित अपवाद नसावा?

एक मात्र झाले. जसजशी वेळ जाते माझे लेखन मात्र बनते माहितीच्या अरण्यातून काढलेल्या मुळ्यांचा अर्क!

 -- रेमीजीयस डिसोजा
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

No comments:

Post a Comment